मुंबई - भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी थेट बीसीसीआय आणि विराट कोहली यांना लक्ष्य केले आहे. भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत, असा आरोप गावस्कर यांनी केला आहे.
सुनिल गावस्कर यांनी एका इंग्रजी संकेतस्थळासाठी कॉलम लिहला आहे. यात ते लिहतात, 'भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि नटराजन यांच्यासारख्या खेळाडूंविरोधात एकप्रकारे भेदभाव होत आहे. अश्विनची गोलंदाजी दर्जेदार असतानाही त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेला कसरत करावी लागते. कारण संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम आहेत.'
विराटला दौरा मध्येच सोडून जाण्याची परवानगी मिळते पण...
बाप होणार आहे म्हणून विराटला दौरा मध्येच सोडून जाण्याची परवानगी मिळते. मात्र, नटराजनला मिळत नाही. आयपीएल स्पर्धेदरम्यान नटराजनच्या पत्नीने बाळाला जन्म दिला. त्याला अद्याप आपल्या मुलीचे तोंड पाहाता आले नाही. त्याला भारतात परत जाण्याची परवानगी का दिली नाही? असा सवाल गावसकरांनी आपल्या कॉलमधून उपस्थित केला.