मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये उभय संघात पहिला सामना खेळवला जाणार असून या सामन्याआधी भारतीय संघाने नेटमध्ये कस्सून सराव केला. सराव सत्रादरम्यान भारतीय गोलंदाजांनी यॉर्करचा मारा करत स्टम्पच मोडले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
श्रीलंकेला टी-२० मालिकेत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. मुंबईत आज मालिकेतील पहिला सामन्याला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे. यासामन्याआधी सोमवारी भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाने सराव केला. या सरावादरम्यान, जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी या जोडीने यॉर्कर चेंडू टाकण्याकडे भर दिला. या सरावसत्रादरम्यान दोन्ही गोलंदाजांनी चक्क स्टम्पच मोडले.
बुमराह मागील काही महिने पाठीच्या दुखण्याने संघाबाहेर होता. त्याचे संघात पुनरागमन झाले असून तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. बुमराहसोबत आज नवदीप सैनी की शार्दूल ठाकूर यांच्यापैकी कोण खेळेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, नेट्समध्ये या दोघांची भेदक गोलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाची काही खैर नसल्याचे, नेटिझन्स म्हणत आहेत.
- भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह. - ऑस्ट्रेलियन संघ -
अॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.
हेही वाचा -भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने, वाचा कोण कोणावर भारी...
हेही वाचा -India Vs Australia : आज 'महामुकाबला'