मुंबई -भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱयात भारतीय संघ ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा याआधी करण्यात आली आहे. आता कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज (रविवार) संघाची घोषणा केली जाऊ शकते.
न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संपूर्ण लयीत असलेल्या केएल राहुलची संघात वापसी होऊ शकते. राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. यामुळे त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकते. दुसरीकडे जर हार्दिक पांड्या तंदुरुस्त ठरला तर त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते. निवड समितीची नजर पांड्याच्या फिटनेस चाचणीवर आहे.
राहुल याच्यासह मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांना संघात स्थान मिळते का हे पाहावे लागेल. गोलंदाजीत युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संघात सामिल करण्यात येऊ शकतं. कारण न्यूझीलंडच्या खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या आहेत. यामुळे सैनीची शक्यता अधिक आहे. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील एकाला कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.