विश्वकरंडक स्पर्धेनंतर आफ्रिकेचा ४० वर्षीय गोलंदाज घेणार निवृत्ती
मला विश्वकरंडक स्पर्धेत खेळायचे आहे. स्पर्धेनंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
जोहान्सबर्ग - इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेनतंर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. परंतु, दक्षिण आफ्रिकेकडून टी-ट्वेन्टी सामन्यात खेळणार आहे, असे इमरान ताहिरने सांगितले आहे.
इमरान ताहिर म्हणाला, की मला विश्वकरंडक स्पर्धेत खेळायचे आहे. स्पर्धेनंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, तोपर्यंतचा माझा आफ्रिकेसोबत करार आहे. यानंतर, जगभरातील विविध टी-ट्वेन्टी लीगमध्ये खेळण्यासाठी मला मंडळाने परवानगी दिली आहे. परंतु, मला दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळायला आवडेल.
दक्षिण आफ्रिकेकडून इमरान ताहिरने २४ फेब्रुवारी २०११ साली एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. ताहिरने दक्षिण आफ्रिकेकडून ९५ एकदिवसीय सामने खेळताना १५६ गडी बाद केले आहेत. तर, ३७ टी-ट्वेन्टी सामने खेळताना ६२ गडी बाद केले आहेत. फेब्रुवारी २०१७ साली ३७ वर्षाचा असलेल्या इमरान ताहिरने आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी क्रमवारीत अव्वलस्थान गाठले होते.
इमरान ताहिरचा जन्म २७ मार्च १९७९ साली लाहोर येथे झाला. मुळचा पाकिस्तानचा असलेल्या ताहिरने दुसऱया देशाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. इमरान ताहिरने पाकिस्तानच्या अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.