मुंबई -भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कुल धोनी सध्या क्रिकेटपासून लांब आहे. अनेक क्रिकेटतंज्ञांनी त्याच्या पुनरागमनाविषयी भाष्य केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अनिल कुंबळेनेही धोनीच्या भविष्याबद्दल आणि टीम इंडियाबद्दल विधान केले. २०२० मधील टी-२० विश्वचषकात धोनीची कशा प्रकारे 'एन्ट्री' होऊ शकते याबद्दल कुंबळेने आपले मत दिले.
हेही वाचा -'विस्डेन'चा दशकातील सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर, मोठ्या क्रिकेटपटूंना वगळले
'धोनी आयपीएलमध्ये कशा प्रकारे खेळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आणि याच गोष्टीमुळे तो आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात असेल की नाही हे कळू शकेल', असे कुंबळेने म्हटले आहे.
'मला खात्री आहे की तुम्हाला विकेट घेण्यासाठी गोलंदाजांची आवश्यकता असेल. अशा परिस्थितीत माझ्या म्हणण्यानुसार कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या खेळाडूंना संघात स्थान मिळायला हवे. मात्र, जेव्हा दवामुळे चेंडू ओला होईल तेव्हा हे दोन फिरकीपटू संघात असतील का? हा प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता', असेही कुंबळेने म्हटले.
महेंद्रसिंह धोनी विश्वकरंडक स्पर्धेनंतर मैदानात दिसला नाही. यामुळे अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत असून तो खेळणार की निवृत्ती घेणार याविषयीच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जमधील धोनीचा सहकारी आणि वेस्ट इंडीज संघाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने, धोनी निवृत्ती घेणार नाही. तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळेल, असा विश्वास बोलून दाखवला होता.
धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत त्याने भारताकडून ३५१ एकदिवसीय सामने आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यांत भारतासाठी ४८७६ धावा, टी-२० मध्ये १०,७७३ एकदिवसीय आणि १६१७ धावा केल्या आहेत.