मुंबई- पाकिस्तानमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे तेथील प्रशासन त्रस्त झाले आहेत. अशा संकट काळात, भारताने जर आम्हाला व्हेंटिलेटरच्या देऊन मदत केली तर आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे.
चीनच्या वुहानमधून सुरू झालेला कोरोनाचा कहर संपूर्ण जगात पसरला आहे. जगात कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारताच्या पारंपरिक शेजारी पाकिस्तानही त्यापासून काही वेगळा नाही. पाकिस्तानमध्ये जवळपास ५ हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. तर ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून पाकिस्तान सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडे मदतीची मागणी केली आहे. अशा संकटाच्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी शोएब अख्तरने भारताकडे मदत मागितली आहे.
शोएब म्हणाला, 'कोरोनाच्या संकटात भारताने जर पाकिस्तानला १० हजार व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिल्यास, पाकिस्तान या मदतीसाठी भारताचा कायम ऋणी राहील.'
दरम्यान, यासोबत शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी, असे सांगितले.
भारत-पाक सामन्यांचा निकाल काय लागेल याच्याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. जर विराट कोहलीने शतक झळकावले तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावले तर भारतामधील चाहते खूश झाले पाहिजेत. १३ वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळे, या मालिकेला चांगली टीआरपी मिळेल. यातून मिळणारे उत्पन्न दोन्ही देशांच्या सरकारने कोरोना लढ्यात वापरावा, असेही अख्तरने सांगितले आहे.
हेही वाचा -'इज्जती'ने निवृत्ती घ्या, असे म्हणणाऱ्या रमीज राजा यांना मलिक म्हणाला...
हेही वाचा -Video : वॉर्नरने केली सर जडेजाच्या राजपूताना सेलिब्रेशनची कॉपी, विचारलं जमलं का?