कोलकाता- भारतीय संघाने बांगलादेश विरुध्दचा दिवस-रात्र कसोटी सामना १ डाव ४६ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने निर्भेळ यश मिळवले. बांगलादेश विरुध्दच्या मालिकेनंतर भारतीय संघाचे आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान अधिक बळकट झाले आहे. भारत सध्या ३६० गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने ७ सामने खेळली आहेत. या सातही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश संघाविरुध्दच्या मालिकांमध्ये निर्भेळ यश मिळवले आहे. या भन्नाट कामगिरीसह भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणातालिकेत ३६० गुणांसह अव्वल स्थानी आहे.
भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघाने ६ सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यात विजय मिळवले आहेत. तर २ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे आणि राहिलेला एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणातालिकेत ११६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा संघ गुणातालिकेत ६० गुणांसह तिसऱ्या क्रमाकांवर आहे.