नवी दिल्ली -भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडीज ३१८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या 'बिग' विजयाने भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ सर्वात शेवटी म्हणजे ९ क्रमांकावर आहे.
भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघासमोर ४१९ धावांचे आव्हान ठेवले होते. या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर अवघ्या १०० धावांवर ढेपळला. भारताने हा सामना ३१८ धावांनी जिंकला.
धडाकेबाज विजयासह भारतीय संघाने आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. भारताने या विजयासह गुणतालिकेत आपले खाते उघडलेच मात्र यासह गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले.
दरम्यान, टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमानुसार एका मालिकेसाठी १२० गुण ठरवण्यात आले असून भारताची वेस्ट इंडीजविरुद्धची कसोटी मालिका ही २ सामन्यांची आहे. यामुळे या मालिकेत १ सामना जिंकणाऱ्या संघाला ६० गुण देण्यात येणार आहेत. तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन संघांना २०-२० गुण वाटून देण्यात येणार आहेत. त्यानुसार भारताला पहिल्या विजयानंतर ६० गुण देण्यात आले आहे. यामुळे भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे.
तसे पहायला गेल्यास भारत आणि श्रीलंका संघाचे गुण समान झाले आहे. मात्र, भारताने वेस्ट इंडीजवर मिळवलेला विजय श्रीलंकेने न्यूझीलंडने मिळवलेल्या विजयापेक्षा मोठा आहे. यामुळे भारताला अव्वल क्रमांक देण्यात आले.
टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानी श्रीलंका तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. तर सर्वात शेवटी म्हणजे ९ नंबर पाकिस्तानचा संघ आहे. दरम्यान पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघाने अद्याप एकही सामना खेळलेला नाही.