मेलबर्न - हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आयसीसी टी-२० विश्वकरंडकाच्या ११ वर्षांच्या इतिहासात भारतीय संघाला पहिल्यादांच अंतिम फेरी गाठता आली आहे. आता अंतिम फेरीत भारतासमोर यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. तीच ऑस्ट्रेलिया जिने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. तर ते तब्बल चार वेळा विश्वकरंडकाचे विजेते आहेत. अशा संघाला भारतीय संघाने साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात १७ धावांनी धूळ चारली होती. यामुळे अंतिम सामना रंगतदार होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
शफाली वर्मावर भारताच्या फलंदाजीची भिस्त -
भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात १६ वर्षीय शफाली वर्माची भूमिका मोलाची ठरली. तिने साखळी फेरीतील चारही सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. शफालीने चार सामन्यात ४० च्या सरासरीने १६१ धावा झोडपल्या. अंतिम सामन्यात शफालीची बॅट तळपणे गरजेचे आहे. शफालीसोबत सलामीवीर स्मृती मानधाना, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज यांनाही चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.
गोलंदाजांची मदार फिरकीवर -
पूनम यादवने विश्वकरंडकात ९ गडी बाद करत आपली छाप सोडली आहे. ती स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मेगान स्कटसह पहिल्या स्थानावर आहे. स्कटनेही ९ गडी बाद केले आहेत. यामुळे पूनमची फिरकी गोलंदाजी भारतासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पूनमशिवाय शिखा पांडे, राधा यादव आणि राजेश्वर गायकवाड यांनाही भेदक मारा करावा लागणार आहे.
भारतासाठी 'ही' बाब डोकेदुखी -
भारतीय संघ साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून अ गटात अव्वल ठरला. पण जिंकलेल्या चारही सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी साजेशी ठरली नाही. याचे कारण सलामीवीर स्मृती मानधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा खराब फॉर्म. स्मृतीला ३ सामन्यात फक्त ३८ धावा जोडता आल्या आहेत. १७ ही त्याची या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आहे. दुसरीकडे हरमनप्रीतने ४ सामन्यात फक्त २६ धावा केल्या आहेत. तिची सर्वाधिक धावसंख्या १५ इतकी आहे. दोघींनाही अंतिम सामन्यात लौकिकास साजेसा खेळ करावा लागणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया हेड टू हेड -
दोनही संघात आतापर्यंत १९ टी-२० सामने झाले आहेत. यात भारताने ६ तर ऑस्ट्रेलियाने १३ सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयी सरासरी ६८ टक्के इतकी आहे. पण २०२० या साली झालेल्या ४ सामन्यात भारताने २ तर ऑस्ट्रेलियाने २ सामन्यात विजय मिळवला आहे. महत्वाची बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियामध्ये भारताची विजयी सरासरी ५० टक्के इतकी आहे.
असा आहे भारतीय संघ -
- हरमनप्रीत कौर (कर्णधार ), शफाली वर्मा, स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रिग्स, तानिया भाटिया, शिखा पांडे, पूनम यादव, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, राधा यादव, अरुंधती रेड्डी, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, ऋचा घोष आणि पूजा वस्त्रकार.
असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ -
- मेग लेनिंग (कर्णधार), बेथ मूनी, रशेल हेन्स, अॅश्ले गार्डनर, डेलिसा किमिंस, एलिस पेरी, एरिन बर्न्स, एनाबेल सदरलँड, निकोला कँरी, एलिसा हिली, जेस जोनासन, सोफी मोलिनिक्स, मेगन स्कट, जॉर्जिया वेरहैम आणि मॉली स्ट्रेनो.