नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आगामी बैठकीत यंदा ऑस्ट्रेलियामध्ये प्रस्तावित असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक पुढील आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत.
कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाले आहे. तर, कोरोनाची स्थिती पाहून विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा विचार केला जाईल, असा निर्णय आयसीसीच्या यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे भवितव्य अद्यापही अंधारातच आहे. 10 जूनला आयसीसीच्या बैठकीत टी-20 विश्वकरंडक आयोजनाबद्दल चर्चा झाली, पण यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला होता.