दुबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी संपल्यानंतर आयसीसीने कसोटीची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला धक्का बसला आहे. फलंदाजी क्रमवारीत विराटची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नई कसोटीतील द्विशतकवीर जो रूट ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला मागे टाकत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.
केन विल्यम्सन (९१९ गुण ) व स्टिव्ह स्मिथ (८९१ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जो रूट ८८३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. लाबुशेन ८७८ गुणांसह चौथ्या, तर विराट पाचव्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात ८५२ गुण आहेत. अजिंक्य रहाणे टॉप-१० मधून बाहेर पडला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारताच्या अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे नुकसान झाले असून त्याची एक स्थानाने घसरण झाली आहे. तो ७५४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
ऋषभ पंतसह यांना झाला फायदा
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची क्रमवारी सुधारली आहे. तो ७०० गुणांसह १३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय शुबमन सात स्थानांच्या सुधारणेसह ४० व्या क्रमांकावर आला आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही यात फायदा झाला आहे. तो दोन स्थान वर सरकून ८१ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.