नवी दिल्ली -भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका आणि इंग्लंडमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
विराटची घसरण -
आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने पहिल्या तीन स्थानांमध्ये प्रवेश केला आहे. त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे. पहिल्या कसोटीनंतर पितृत्वाच्या रजेसाठी गेलेल्या विराटची ८६२ गुणांसह चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर, लाबुशेनच्या खात्यात ८७८ गुण जमा झाले आहेत.
याशिवाय ऑस्ट्रेलिया दौर्यावर शानदार कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला एका स्थानाची बढती मिळाली असून तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेच्या दौर्यावर गेलेल्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटने क्रमवारीत सहा स्थानांची कमाई केली असून तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार द्विशतक झळकावले आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गोलंदाजांमध्ये कमिन्स अव्वल -
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाा रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना अनुक्रमे आठवे व नववे स्थान गाठले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडनेही एक स्थान मिळवत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. त्याचबरोबर, भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसर्या स्थानावर पोहोचला आहे. तर, अश्विनला एका स्थानाचा फायदा झाला आहे.
याशिवाय ही कसोटी मालिका जिंकण्याचा टीम इंडियालाही फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाला नमवून भारत आता कसोटी क्रमवारीत दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया आता संघ क्रमवारीत तिसर्या स्थानावर आला आहे.
हेही वाचा - धोनीच्या संघातून बाहेर पडला वर्ल्डकप विजेता खेळाडू