मेलबर्न- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये (एमसीजी) उद्या (रविवार) खेळला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातल्यास कोणता संघ विजेता ठरणार? हा प्रश्न चाहत्यांना सतावत असेल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी सकाळी मेलबर्नमध्ये काही काळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्ण दिवस ऊन असेल. त्यामुळे अंतिम सामना होऊ शकतो. पण सायंकाळीही जर पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे सामना न झाल्यास हा सामना सोमवारी (९ मार्च ) राखीव दिवशी होईल.
पण जर ९ मार्चलाही पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सामना झाला नाही तर आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघाना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येणार आहे.