दुबई - न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करत केएल राहुलने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली. राहुलने ५ सामन्याच्या मालिकेत सर्वाधिक २२४ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच टी-२० क्रमवारी जाहीर केली असून यात राहुलने फलंदाजांच्या क्रमवारीत गरुड झेप घेताना कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी पटकावली.
राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिका चोख पार पाडली. या मालिकेत त्याने ५६ च्या सरासरीने २ अर्धशतकासह २२४ धावा केल्या. त्याने या कामगिरीसह जागतिक क्रमवारीत चार स्थानाची सुधारणा करताना दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ८७९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
रोहित, श्रेयस आणि मनीष यांच्याही क्रमवारीत सुधारणा -
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर रोहित शर्माच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तो तीन स्थानांच्या सुधारणेसह टॉप-१० मध्ये दाखल झाला आहे. श्रेयस अय्यर ५५ व्या, तर मनीष पांडे ५८ व्या स्थानावर आला आहे. कर्णधार विराट कोहलीने आपले ९ वे स्थान कायम राखले आहे.