दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) क्रिकेटपटू आमिर हयात आणि अश्फाक अहमद यांचे निलंबन केले आहे. या दोघांविरूद्ध भ्रष्टाचार विरोधक कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप निश्चित झाले आहेत. या दोघांना तात्काळ प्रभावाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयसीसी पुरूष टी-२० विश्वकरंडक पात्रता स्पर्धेदरम्यान अमिरात क्रिकेट बोर्डाने (इसीबी) अश्फाकला निलंबित केले होते, परंतु आरोप अद्याप ठरवण्यात आलेले नव्हते. या दोघांनी लाच घेऊन मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला होता.
३८ वर्षीय हयात मध्यमगती गोलंदाज असून त्याने ९ एकदिवसीय आणि ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर ३५ वर्षीय अश्फाकने १६ एकदिवसीय आणि १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
"आरोपांना उत्तर देण्यासाठी खेळाडूंना १३ सप्टेंबरपासून १४ दिवसांचा कालावधी असेल. आयसीसी या आरोपांबाबत आत्ता याविषयी अधिक प्रतिक्रिया देणार नाही", असे आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आमिर आणि अश्फाक यांच्यावर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम २.१.३अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, त्यांच्यावर कलम २.४.२ ते कलम २.४.५पर्यंत इतर चार आरोप लावण्यात आले आहेत.