नवी दिल्ली - विश्वकरंडक स्पर्धेत रविवारी इंग्लंडच्या विरुध्दच्या सामन्यात 'मेन इन ब्लू' म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघ मैदानावर उतरला तो ऑरेंज जर्सीमध्ये. या सामन्यात अजेय असलेल्या भारताला साहेबांकडून ३१ धावांनी पराभूत व्हावे लागले. यानंतर चाहत्यांनी भारतीय संघाला ट्रोल करायला सुरूवात केली. अनेक चाहत्यांनी तर भारताच्या पराभवाचे खापर नविन 'भगव्या' जर्सीवर फोडले. पाहूयात या संदर्भातील आढावा...
जर्सी का बदलली गेली -
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागला. यावर भारतीय संघानेच का जर्सीचा रंग बदलायचा अशी प्रतिक्रिया रंगल्या. मात्र, नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. जर्सी बदलने हे प्रामुख्याने फुटबॉल विश्वात केले जाते. कारण दोन्ही संघातील खेळाडू ओळखता यावे, याकारणाने जर्सीमध्ये बदल करण्यात येतो. हा बदल क्रिकेटमध्येही करण्यात आला.
भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने त्यांच्या नेहमीच्या निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी लाल आणि निळ्या कॉम्बिनेशनची जर्सी वापरली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेहमीपेक्षा वेगळी जर्सी वापरली होती.
कोठे तयार झाली भगवी जर्सी -
टीम इंडियाची नवी भगवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली. जर्सीचे डिझाइन करताना, अनेक बाबीचा विचार करण्यात आला. त्यामध्ये भारतीय संघाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचं 'इंडिया' हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत अदलाबदल करून जर्सी डिझाइन्स करण्यात आली.
भगव्या 'जर्सी'वरुन राजकारण -
भारताची निळी जर्सी बदलून भगवी करण्यात आली. तेव्हा याला अनेक राजकारण्यांनी कडाडून विरोध केला. त्यामध्ये प्रामुख्याने अबू आझमीचे नाव घेता येईल. त्यांनी तर भारतीय संघ ज्याप्रकारे कामगिरी करत आहे त्याची प्रशंसा आहे. पण मोदी सरकार देशाचे 'भगवीकरण' करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप केला. देशात ठिकठिकाणी भगव्या जर्सीच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले. भारताच्या पराभवानंतर तर लढतीत भगवी जर्सी परिधान केल्यानेच भारतीय संघाचा पराभव झाला असल्याचा अजब दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला.