लंडन -आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक २०१९ या स्पर्धेचे आज दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन दिमाखात पार पडले. यंदाचा क्रिकेट विश्वकरंडक इंग्लंड आणि वेल्समध्ये होत असून इंग्लंडची राजधानी लंडन येथे या स्पर्धेचे उद्घाटन झाले. ३० मे ते १४ जुलैपर्यंत होणाऱ्या विश्वकरंडकासाठी जगभरातून १० संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.
विश्वकरंडक उद्घाटनाचा सोहळा लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसजवळील प्रतिष्ठित लंडन मॉलमध्ये आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९.३० वाजता हा सोहळा सुरू झाला. भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवरून या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या भव्य उद्घाटन समारंभात अनेक दिग्गज आजी-माजी क्रिकेट खेळाडू आणि इंग्लंडच्या महाराणीही उपस्थित होत्या. या उद्घाटन सोहळ्यासाठी ४ हजार क्रिकेट चाहत्याची उपस्थिती होती. या विश्वकरंडक स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळले जातील जे ४६ दिवस चालणार आहेत.
विश्वकरंडकासाठी जगभरातून १० संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत या सोहळ्याचे सुत्रचंलन इंग्लडचा माजी क्रिकेटपटू अँन्ड्र्यू फ्लिंटॉप, आणि क्रिकेट निवेदिका शिवानी दांडेकर यांनी केले. इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह भारताच्या विराट कोहली यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप उत्कंठावर्ध असणार आहे. आमच्या मायभूमीत हा सोहळा पार पडत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असे मॉर्गन यावेळी म्हणाला. तर याठिकाणी येऊन आनंद झाला असून आम्हाला क्रिकेट चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. उद्याच्या स्पर्धेचे नक्कीच दडपण असणार आहे. मात्र, मैदानातील प्रेक्षकांची गर्दी आमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल, असे विराट कोहली यावेळी म्हणाला.
यानंतर इंग्लिश गायक जॉन न्युमन याच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या 'फिल द लव' या गाण्यावर उपस्थितांनी थिरकत आनंद घेतला. या कार्यक्रमानंतर ६० सेकंद चॅलेंज हा एक खेळ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ६० सेंकंदात प्रत्येक देशाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचे आव्हान ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलीयाचे माजी फलंदाज डेव्हिड बून यांनी या खेळासाठी पंचाची भूमिका पार पाडली. यावेळी दिग्गज खेळाडू व्हिव रिचर्ड्स, जॅक कॅलीस, ब्रेट ली, आणि केविन पीटरसन उपस्थित होते.
यावेळी प्रथम फलंदाजी करण्याठी आलेल्या अफगाणीस्थानी खेळाडूंनी ५२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने एका मिनिटात ४३ धावा केल्या. तर विंडिजकडून व्हिव रिचर्डस आणि ऑलिम्पिक खेळाडू योहान ब्लेक यांनी ४७ धावा बनवल्या. बांग्लादेशाकडून खेळलेल्या अब्दुर रज्जाक याला केवळ २२ धावा बनवता आल्या. विशेष म्हणजे या खेळात पाकिस्तानकडून मलाला युसुफझई सहभागी झाली होती. तिने ३८ धावा खेचल्या. ऑस्ट्रेलियांच्या ब्रेट ली ने ६० सेकंदात ६९ धावा कुटल्या. न्युझीलंडने ३२ तर दक्षिण आफ्रकेकडून जॅक कॅलीस व फुटबॉलपटू स्टीवन पेनार यांनी ४८ धावा कुटल्या. तर इंग्लडच्या पीटरसनने सर्वाधीक ७४ धावा बनवल्या. भारतातर्फे खेळलेल्या अनिल कुंबळे आणि फरहान अख्तर यांनी सर्वात कमी १९ धावा काढल्या.
गतविजेत्या विश्वकरंडक संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क आणि इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रामी स्वॅन यांच्या हस्ते विश्वकरंडकाचे अनावरण करण्यात आले. या वर्षीची विश्वकरंडक स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार असून एकून ६ संघ यावेळी विजयाचे दावेदार मानले जात आहेत, असे क्लार्क यावेळी म्हणाला. या स्पर्धेतील पहिला सामना ओव्हल मैदानावर यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा खेळला जाणार आहे.