लंडन - क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा अशी ओळख असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वकरंडकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया हे २ दिग्गज संघ ऐकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी खुप महत्वाचा आहे, कारण दोन्ही संघ हे या विश्वकंरडकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
क्रिकेटविश्वाच्या कुंभमेळ्यात आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान हा सामना लंडनच्या द ओव्हल मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत विजयी सलामी दिलीय. तर दुसरीकडे ५ वेळचे विश्वविजेत्या कांगारुंनीही पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून विश्वचषकावर आपली दावेदारी सिद्ध केलीय.
ऑस्ट्रेलियाने ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आपल्या मागच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला. ३८ धावांमध्ये ४ विकेट गेले असतानाही स्टिव्ह स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईलने केलेल्या दमदार खेळीमुळे कांगारुंनी हातातून गेलेला विजय खेचून आणला. या सामन्यात नॅथनने आक्रमक फटकेबाजी करत ६० चेंडूत ९२ तर स्टीव स्मिथने ७३ धावांची झुंजार खेळी केली.
भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. दोन्ही संघात दिग्गज गोलंदाजांचा भरणा आहे. एकीकडे असेल आपल्या पहिल्या सामन्यात ४ विकेट पटकावणारा चहल तर दुसरीकडे विंडीजचा निम्मा संघ गारद करणारा मिचेल स्टार्क. त्यामुळे या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार, हे मात्र नक्की.
या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ
- भारत -विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
- ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.