दुबई- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय सामन्यात स्थानिक पंचांना पंचगिरी करण्यास संधी देण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या कमिटीने (आयसीसी) केली आहे. ही शिफारस भारतीय सामनाधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरु शकते. कारण आंतरराष्ट्रीय सामन्यात खास करुन कसोटी सामन्यांमध्ये पंचगिरी करताना अनुभवाची गरज असते. पण भारतातील स्थानिक पंचाकडे आंतरराष्ट्रीय कसोटीचा अनुभव नाही. यामुळे त्यांच्यासाठी हे काम आव्हानात्मक असणार आहे. असे विद्यमान व माजी सामनाधिकाऱ्यांचे मत आहे.
मागील वर्षी आयसीसीच्या एलिट पॅनलच्या पंचांमधून भारतीय पंच एस. रवी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर त्यात एकाही भारतीय पंचाचा समावेश नाही. कसोटी सामन्यांसाठी पंचांची या यादीतून निवड करण्यात येते. त्यापेक्षा खालच्या श्रेणीमध्ये असलेल्या आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलच्या पंचांमध्ये चार भारतीय आहेत. त्यात नितीन मेनन, सी. शमशुद्दीन, अनिल चौधरी, विरेंद्र वर्मा यांचा समावेश आहे.