दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या खेळातील नियमांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. या नियमांमध्ये लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये घरगुती पंचांना मंजुरी देण्यात आली आहे.
आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने (सीईसी) अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील क्रिकेट समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये कोरोना घटनेत एका पर्यायी खेळाडूला खेळण्यास मान्यता दिली आहे. मात्र हा नियम टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये लागू होणार नाही.
''खेळाडू चेंडूचा उपयोग करण्यासाठी लाळेचा वापर करू शकणार नाहीत. सुरुवातीला एखाद्या खेळाडूने असे केले तर पंचांकडून त्याला सांगण्यात येईल. परंतु त्याने वारंवार असे केल्यास संघाला इशारा देण्यात येईल'', असे आयसीसीने लाळबंदीसंदर्भात म्हटले आहे.
तसेच सामन्यांमध्ये तटस्थ पंच नसतात. त्यांना तात्पुरते खेळातून काढले गेले आहे. आयसीसी आपल्या एलिट पॅनेलमधून स्थानिक सामन्यांधिकाऱ्यांची नेमणूक करेल.
यासह प्रत्येक डावात अतिरिक्त डीआरएस रिव्ह्यू मंजूर करण्यात आला आहे. आता प्रत्येक संघ कसोटीतील प्रत्येक डावात तीन आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन रिव्ह्यू घेऊ शकतात. जेव्हा कमी अनुभवी पंच मैदानात असतील तेव्हा हा निर्णय़ फायदेशीर ठरू शकतो.