अबुधाबी -आयपीएलच्या तेराव्या हंगामात बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा एकतर्फा पराभव केला. कोलकाताविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने, बरे झाले आम्ही नाणेफेक गमवली, अशी प्रतिक्रिया दिली. कोलकाताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. तेव्हा बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. या माऱ्यासमोर कोलकाताच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कोलकाताचा संघ २० षटकांत ८ विकेट गमावून ८४ धावा करू शकला. बंगळुरूने हे सोपे आव्हान सहज पूर्ण केले.
सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला, नाणेफेक गमावणं आमच्यासाठी चांगले ठरले. कारण आम्ही जर नाणेफेक जिंकली असती तर आम्ही देखील प्रथम फलंदाजीच स्वीकारली असती.
रणनीतीबद्दल विराट म्हणाला, आम्ही वॉशिग्टन सुंदर आणि ख्रिस मॉरिस या दोघांकडून गोलंदाजीची सुरुवात करण्याचा विचार करत होतो. पण अचानक आम्ही निर्णय बदलला आणि मॉरिससोबत मोहम्मद सिराजला गोलंदाजी दिली. व्यवस्थापनाने एक सिस्टम बनवले आहे. यात खास रणनीती आखली जाते. सगळं काही असेच घडत नसते. आमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी असतात.