मुंबई- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे कोलन इन्फेक्शनमुळे निधन झाले. काल (मंगळवार) अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफान यांना कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. इरफान यांच्या अचानक जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी इरफानला ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, इरफान खान यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. युवराजलाही इरफानप्रमाणे कॅन्सरचा आजार झाला होता. पण युवीने या आजारावर मात करत दमदार पुनरागमन केले. इरफान मात्र, यात अपयशी ठरला.
युवराजने ट्विटच्या माध्यमातून इरफान यांना श्रद्धाजली वाहिली. त्यात तो म्हणतो, 'मला तो प्रवास माहित आहे, मला त्या वेदना माहित आहेत आणि मला हेही माहित आहे, की तू अखेरपर्यंत संघर्ष केलास. काही जण यावर मात करतात, पण काही जणांना ते शक्य होत नाही. इरफान तू आता नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील, अशी मला आशा आहे.'
इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्युमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर ते अलिकडेच भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणीखाली वावरत होते. काल (मंगळवार) त्यांची अचानक तब्येत बिघडली.