मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. विरोधी संघाच्या खेळाडूंनी त्याला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी तोंडाऐवजी तो आपल्या बॅटने उत्तर देत असे. अपवादात्मक काही घटना सोडल्यास द्रविडला मैदानात राडा घालताना कोणी पाहिलेले नाही. मात्र, द्रविडलाही प्रचंड राग येतो, असे माजी सलामीवीर खेळाडू विरेंद्र सेहवागने सांगितलं.
भारताचा संघ २००६ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यामध्ये महेंद्रसिंह धोनीने एक चुकीचा फटका मारला होता. यामुळे द्रविड त्याच्यावर नाराज झाला होता आणि त्याने भर मैदानात धोनीला फटकारले होते, असे सेहवागने सांगितले. एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना सेहवागने हा किस्सा सांगितला आहे.
सेहवाग म्हणाला की, आम्ही पाकिस्तानच्या दौऱ्यावर होतो. तेव्हा धोनी नुकताच संघात आला होता. त्याने एक चुकीचा फटका मारला आणि तो पॉईंटवर झेलबाद झाला. त्यामुळे द्रविड खूपच नाराज झाला आणि त्याने धोनीला चांगलेच खडेबोल सुनावले होते.