मुंबई - भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्मा आता दुखापतीतून सावरला आहे. तो लॉकडाऊन संपल्यानंतर लवकरच मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. पण, त्याला भारतीय संघात परतण्यासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळेल.
काही दिवसांपूर्वी रोहितने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितलं की, 'लॉकडाऊन पूर्वीच मी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी पूर्णपणे सज्ज झालो होतो. माझी फिटनेस टेस्ट होणे बाकी होती. अशात लॉकडॉऊनची घोषणा झाली. आता हा लॉकडाऊन संपल्यानंतर मी एनसीएमध्ये जाऊन फिटनेस टेस्ट देईन. त्यानंतर मी सरावाला सुरुवात करणार आहे.'
दरम्यान, रोहित शर्माला फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यात दुखापत झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात विराटच्या जागी रोहित शर्मा नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत होता. या सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याने उर्वरित दौरा मध्येच सोडत मायदेश गाठले होते.