नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्यावर सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, या शुभेच्छा संदेशानंतर तिला कट्टरतावाद्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. याव्यतिरिक्त तिला सोशल मीडियावर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या. या लोकांविरूद्ध तिने कोलकाताच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हसीन जहाँने या लोकांविरूद्ध त्वरित कारवाईचीही विनंती केली आहे. ''५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मी आमच्या हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या. नंतर मला काही विशिष्ठ मते असणाऱ्यांनी सतत त्रास दिला. काही लोकं मला जीवे मारण्याची आणि बलात्काराची सतत धमकी देत आहेत. सोशल मीडियावरून सतत होणार्या हल्ल्यामुळे मला असुरक्षित वाटत आहे. जर हे असेच सुरू राहिले तर मी मानसिकदृष्ट्या निराश होईन. मी माझ्या मुलीबरोबर एकटीच राहत असल्याने मला अत्यंत असुरक्षित वाटत आहे. आता प्रत्येक सेकंद माझ्यासाठी दु: स्वप्न आहे'', असे तिने तक्रारीत म्हटले आहे.