जोहान्सबर्ग - श्रीलंकेविरुद्ध होणाऱया ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. त्यात अनुभवी फलंदाज हाशिम आमला याला संघात स्थान देण्यात आले नाही. वेगवान गोलंदाज लुंगी एंगिडी हा घुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.
दोन्ही संघातील पहिला सामना ३ मार्च रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. विश्वचषक २०१९ पूर्वी आफ्रिकेची ही शेवटची मालिका असणार आहे.
आफ्रिकेच्या संघात डाव्या हाताने गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेला संघात स्थान देण्यात आले. नॉर्टजने मजांसी सुपर लीग मध्ये १५० किलोमीटर प्रति वेगाने गोलंदाजी करत होता.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत संघात निवडण्यात आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन आणि वेगवान गोलंदाज डेन पॅटरसन यांना संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ -
फाफ-डु प्लेसिस (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डेविड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एंगिडी, रीजा हेंड्रिक्स, इमरान ताहिर, एनरिच नॉर्टजे, अंदिले फेहलुकवायो, ड्वाइन प्रीटोरियस, कंगिसो रबाडा, तबरेज शम्सी, डेल स्टेन, रस्सी वॅन डेर ड्यूसेन.