नवी दिल्ली -भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या 'स्वॅग' अंदाजासाठी ओळखला जातो. पांड्याचे कपडे, नवीन गाड्या, घड्याळे, चष्मे हे सोशल मीडियावर सतत ट्रेंडिंग असतात. स्टार खेळाडू हार्दिक पांड्याला लंडनमध्ये नुकत्याच एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या शस्त्रक्रियेनंतर पांड्याने एक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले होते. या फोटोत त्याने घातलेले घड्याळ चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा -१८ वर्षीय लक्ष्य सेनची डच ओपनच्या अंतिम सामन्यात धडक
पांड्याच्या या घड्याळाची किंमत थक्क करणारी आहे. हे घड्याळ Patek philippe कंपनीचे आहे. रोज गोल्ड नॉटिलस असे नाव असलेल्या या घड्याळाची किंमत तब्बल ८१ लाख एवढी आहे. शिवाय हे घड्याळ लगेच विकत घेता येऊ शकत नाही. कारण या घड्याळासाठी आठ वर्षे वाट पाहावी लागते.
आगामी बांगलादेश विरुध्दच्या टी-२० मालिकेसह पुढील काही महिन्यांपर्यंत हार्दिक क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याला मागील वर्षी दुबईत झालेल्या एशिया कप स्पर्धेत पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत पुनरागमन केले होते. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान पाठीला दुखापत होणारा हार्दिक भारताचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. यामुळे बुमराहने आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.
लंडनमधील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, हार्दिकने 'मी लवकरत पुनरागमन करेन' असा संदेश दिला होता. त्यामुळे चाहत्यांना तो कधी पुनरागमन करतो, याकडे लक्ष लागले आहे.