मुंबई- भारताचे कपिल देव आणि पाकिस्तानचे इम्रान खान यांच्या तुलनेत हार्दिक पांड्या कुठेच नसल्याचे मत, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने व्यक्त केलं आहे. पण, त्याने हार्दिकमध्ये गुणवत्ता असल्याचे सांगत, त्याला मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.
रझाक म्हणाला, 'हार्दिक पांड्या चांगला खेळाडू आहे. तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळू होऊ शकतो. पण त्याला त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. त्याला मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्याची गरज आहे. तो मागील काही महिन्यात सातत्याने दुखापतग्रस्त होत आहे. एखादा खेळाडू जेव्हा खूप पैसा कमावतो, तेव्हा तो विश्रांतीचा जास्त विचार करतो. मोहम्मद आमिरच्या बाबतीतही हेच घडलं. त्याने मेहनत घेतली नाही आणि त्यामुळे त्याची कामगिरी खराब होत गेली'
भारताला कपिल देव आणि पाकिस्तानला इम्रान खान यांनी विश्वकरंडक जिंकून दिला. ते सर्वकालिन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. या पंक्तीत हार्दिक कुठेही नाही. मी स्वत: अष्टपैलू खेळाडू होतो, पण माझी तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही. ते महान खेळाडू होते, असेही रझाक म्हणाला.