नवी दिल्ली -अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने भारताच्या टी-20 संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये खेळत असल्याने मी देशासाठी टी-20 खेळू शकतो, असे हरभजनने म्हटले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा हरभजन येत्या जुलैमध्ये 40 वर्षाचा होईल.
आयपीएलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा हरभजन हा तिसरा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत दीडशे विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. 2016च्या आशिया चषकात हरभजनने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
भज्जी म्हणाला, “जर मी आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करू शकलो तर, मी तयार आहे. गोलंदाजांना हे अतिशय कठीण आहे. कारण मैदाने खूपच लहान आहेत आणि जगातील सर्व मोठे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. त्यांच्याविरूद्ध गोलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. जर तुम्ही त्यांच्याविरूद्ध आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकत असाल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकता."
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही निवडकर्ता दुर्लक्ष करत असल्याचेही भज्जी म्हणाला. "ते लोक माझ्याकडे पाहत नाहीत कारण त्यांना वाटते की मी वयस्कर झालो आहे. शिवाय, मी घरगुती क्रिकेटही खेळत नाही. गेल्या चार-पाच वर्षात मी आयपीएलमध्ये असतानाही त्यांनी मला पाहिले नाही. मी चांगली कामगिरी करत आहे, विकेट घेत आहे आणि माझ्या नावावर अनेक विक्रमही आहेत", असे हरभजनने सांगितले.