मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात, २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. देशातील बहुतांश जनता घरीच थांबली आहे. पण काही जण मात्र लॉकडाऊनचे पालन करत नाहीत, अशा लोकांना भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने फटकारले आहे.
हरभजनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, पोलिसांना काही जण मिळून मारहाण करताना दिसत आहेत. तसेच काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर हरभजन म्हणतो, पोलिसांबद्दलचा आपला व्यवहार बदलण्याची गरज आहे. आपल्या सुरक्षेसाठी ते स्वत:चे आयुष्य पणाला लावून दिवस-रात्र रस्त्यावर फिरत आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे असून यासाठी लॉकडाऊन यशस्वी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात देशाच्या पंतप्रधानांपासून ते सिनेस्टार आणि खेळाडू वारंवार आवाहन करत आहे. असे असताना देखील काही जण रस्त्यावरून फिरत आहे. अशा लोकांवर पोलिस कारवाई करत आहे.