मुंबई- कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू या काळात आपापल्या घरात कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशा स्थितीमध्ये काही खेळाडू जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सचिन तेंडुलकरबद्दलची एक जुनी आठवण सांगितली आहे.
भारतीय संघाने २ एप्रिल २०११ रोजी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा धुव्वा उडवत विश्वकरंडक जिंकला होता. हरभजन सिंगने या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतरची एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने, विश्वकरंडक जिंकणे आमचे स्वप्न होते, आम्ही तो जिंकला. विजेतेपदाचा चषक हाती घेणे हा एक खास अनुभव होता. संघातील सर्व खेळाडू यावेळी भावूक झाले होते. आनंदाने आमच्या डोळ्यातून आश्रू येत होते, असे सांगितले.
पुढे बोलताना तो म्हणाला, 'विश्वकरंडक जिंकल्यानंतर आम्ही सचिनला एका वेगळ्या रुपात पहिले. सचिन सेलिब्रेशनच्या रात्री पत्नी अंजलीबरोबर डान्स करत होता. यापूर्वी आम्ही सचिनला कधीही डान्स करताना पाहिले नाही. सचिन अंजली वहिनीसोबत 'डार्लिंग, आंखें चार करने दो', या गाण्यावर तुफान डान्स करत होता. आम्ही सर्वजण त्या क्षणाचा आनंद घेत होतो.'