नवी दिल्ली -आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सध्या जय्यत तयारी करत आहे. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला चौथ्या क्रमांकावरील फंलदाजीचा प्रश्न अजूनही सतावतो आहे. विश्व करंडक स्पर्धेनंतर, रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याची कामगिरीही निराशाजनक राहिली. अशातच, फिरकीपटू हरभजनने चौथ्या क्रमांकासाठी एका खेळाडूचे नाव सुचवले आहे.
हेही वाचा -टेनिस : सुमित नागलने केला भीमपराक्रम, विदेशी मैदानावर जिंकला पहिलाच किताब
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ चौथ्या क्रमांकाच्या फंलदाजाच्या शोधात आहे. या स्थानासाठी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव योग्य असल्याचे भज्जीने म्हटले आहे. 'स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान का मिळाले नाही, याबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र, तु मेहनत करत राहा तुझी वेळ नक्कीच येईल', असे भज्जीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
सूर्यकुमारने आयपीएलमधील ८५ सामन्यात १५४४ धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीतही तो उत्तम प्रदर्शन करत आहे. या स्पर्धेच्या एका सामन्यात त्याने ३१ चेंडूत ८१ धावा चोपल्या होत्या. या खेळीमध्ये त्याने आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले होते. शानदार कामगिरी करूनही त्याला संघात का स्थान देण्यात आले नाही असा सवाल भज्जीने या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.