नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या घोषणेनंतर हरभजन सिंगने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीला धारेवर धरले आहे. मुंबईच्या सूर्यकुमार यादवची निवड न केल्याबद्दल निवड समितीवर हरभजनने टीका केली.
हेही वाचा -पी.व्ही. सिंधू अत्यंत असंवेदनशील; गरज असेल तेव्हाच बोलते, माजी प्रशिक्षकाचे खळबळजनक आरोप
मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱया सूर्यकुमारला न्यूझीलंडविरूद्ध दोन सामने आणि तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या 'अ' संघात स्थान मिळाले, पण राष्ट्रीय संघात त्याचा समावेश झाला नाही. 'सूर्यकुमारने काय चूक केली आहे याबद्दल मला आश्चर्य वाटते? त्याने भारतीय संघातील इतर खेळाडूंप्रमाणेच धावांची नोंद केली आहे, मग त्याच्याशी वेगळा व्यवहार का केला जात आहे?', असे भज्जीने ट्विटमध्ये म्हटले आहे.
सूर्यकुमारने ७३ प्रथम श्रेणी सामन्यात ४९२० धावा केल्या आहेत. २९ वर्षीय सूर्यकुमारची सरासरी ४३.५३ असून त्यात १३ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० मध्ये त्याने १४९ सामन्यांमध्ये ३१.२७ च्या सरासरीने ३०१२ धावा केल्या आहेत.