किंग्स्टन - विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने मजबूत पकड बनवली आहे. वेस्ट इंडीजचा पहिल्या डावात खुर्दा उडवल्यानंतर, भारताने दुसऱ्या डावात ४ बाद १६८ धावा केल्या. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले.
हेही वाचा -IND vs WI 2ND TEST : विंडीजचे दोन फलंदाज माघारी, चौथ्याच दिवशी भारताला विजयाची संधी
या सामन्यामध्ये आपले पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या विहारीने क्रिकेटच्या देवाच्या एका विक्रमाची बरोबरी केली. हनुमा विहारीने दुसऱ्या डावात नाबाद ५३ तर, पहिल्या डावातही हनुमा विहारीने १११ धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणारा विहारी दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध १९९० साली मँचेस्टर कसोटीत अशी कामगिरी केली होती.
भारताने दिलेल्या ४६८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना विंडीजने दुसऱ्या डावामध्ये ४५ धावांत दोन फलंदाज गमावले आहेत. त्यामुळे चौथ्या दिवसात विंडीजच्या उरलेल्या सर्व फलंदाजांना माघारी पाठवून विजय मिळवण्यास भारतीय संघ उत्सुक असणार आहे.
जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडीजचा पहिला डाव ११७ धावांवर आटोपला होता. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने आपला दुसरा डाव ४ बाद १६८ धावांवर घोषित करुन वेस्ट इंडिजला विजयासाठी आव्हान दिले. त्यामध्ये अजिंक्य रहाणे ६४ आणि हनुमा विहारी ५३ धावांची खेळी करत १११ धावांची भागीदारी केली.