हॅमिल्टन- न्यूझीलंड एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात हनुमा विहारीचे शतक (१०१) आणि चेतेश्वर पुजाराची ९२ धावांची खेळी जोरावर भारतीय संघाला पहिल्या दिवशी सर्वबाद २६३ धावांची मजल मारता आली. विहारी, पुजारा वगळता अन्य फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्कारली.
मयांक अगरवाल (१), पृथ्वी शॉ (०) आणि शुभमन गिल (०) हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरले. सामन्याच्या सुरुवातीलाच भारताची अवस्था ३ बाद ५ अशी झाली होती. अजिंक्य रहाणेसुद्धा १८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विहारी आणि पुजारा यांनी पाचव्या गड्यासाठी १९५ धावांची भागीदारी केली. पुजारा ९२ धावांवर बाद झाला.
पुजारा पाठोपाठ विहारीही बाद झाला. त्याने १०१ धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या तळातील फलंदाजांना फार काळ तग धरु दिला नाही. अखेर भारताला पहिल्या डावात २६३ धावांवर समाधान मानावे लागले. कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्याऐवजी नेटमधील सत्राला प्राधान्य दिले. न्यूझीलंडकडून स्कॉट कुगेलिनने ४० धावांत तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
- भारत (पहिला डाव) : ७८.५ षटकांत सर्व बाद २६३ (हनुमा विहारी १०१, चेतेश्वर पुजारा ९२; स्कॉट कुगेलिन ३/४०)