मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अॅरोन फिंचने त्याला पडलेल्या भयानक स्वप्नांचा उलगडा केला आहे. २०१८ या वर्षातील भारताच्या दौर्यादरम्यान वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी फिंचला 'सळो की पळो' करून सोडले होते. या दोघांच्या गोलंदाजीवर सातत्याने बाद होत असल्याने, फिंचला भयानक स्वप्ने पडत होती.
हेही वाचा -इटलीच्या ११ फूटबॉलपटूंना कोरोनाची लागण
एका वेब सीरिजमध्ये फिंचने या स्वप्नांचा उलगडा केला. 'बुमराहचा सामना कसा करावा याचा मी रात्रभर विचार करायचो. भूवनेश्वर तर मला इन स्विंगने बाद करत होता. तो मला मस्करीमध्ये बाद करतोय असं मला वाटायचं. रात्रभर मी माझ्या विकेटबद्दल विचार करायचो. या विचाराने मला प्रचंड घामही यायचा', असे फिंचने म्हटले आहे. या दौऱ्यातील पहिल्या तीन एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यात फिंचने भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर गुडघे टेकले होते.
भारतासाठी हा अविस्मरणीय दौरा होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर भारताने ३-१ असा विजय मिळवला होता. त्याचवेळी, टीम इंडिया प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी झाली होती. या दौऱयातील एकदिवसीय मालिका भारताने २-१ ने जिंकली. तर उभय संघातील टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.