मुंबई- कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. पण रोजंदारीवर काम करणारे मजूर आपापल्या गावाला जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाने निघाले आहेत, यावर भारताचा फिरकीपटू हरभजनने चिंता व्यक्त केली. तो तो ANI वृत्तसंस्थेशी बोलत होता.
सध्याच्या घडीला देशाची राजधानी दिल्लीत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर आपापल्या गावाला जाण्यासाठी बस स्थानकांवर मोठ्या संख्येने गर्दी करुन उभे आहेत, यावर हरभजनने चिंता व्यक्त केली.
या विषयावर तो म्हणाला, 'कोणतीही घोषणा करण्याआधी सर्व घटक म्हणजे, रोजंदारीवर काम करणारे आणि इतर राज्यातील मजूरांचा विचार व्हायला हवा. कारण त्यांच्याकडे रहायला घर, खायला अन्न, प्यायला पाणी यासारख्या मुलभूत सुविधा नसतात. सरकारने या लोकांची काळजी घेऊन त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे.'
दिल्लीच्या बसस्थानकांवरचे चित्र पाहणे हे वेदनादायी आहे, असेही हरभजन म्हणाला. याशिवाय त्याने क्रिकेट आणि आयपीएल विषयावरही भाष्य केलं.