मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ग्लेन मॅक्सवेलवर १४.२५ करोडची तगडी बोली लावत आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले आहे. मॅक्सवेलने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ठीकठाक सुरूवात केली. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३९ धावा केल्या. या सामन्यात बंगळुरूने मुंबईवर २ गडी राखून विजय मिळवला. यादरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने मॅक्सवेल या हंगामात किती धावा करू शकतो, याबाबतची भविष्यवाणी केली आहे.
इरफान पठाण याने या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मॅक्सवेल या हंगामात ४०० धावांच्या आसपास धावा करू शकतो. ग्लेन मॅक्सवेलने मुंबईविरुद्धच्या सामन्यात आत्मविश्वासाने फलंदाजी केली. तो पाहून इरफान म्हणाला की, मॅक्सवेल मुंबईविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या ७ चेंडूवर पूर्णपणे आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळाला. तो या हंगामात जवळपास ४०० धावा करू शकतो.