नवी दिल्ली -आयपीएलचा नवीन हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी या स्पर्धेतील किंग्स इलेव्हन पंजाब संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी संघाबाहेर असू शकतो. पंजाबने मॅक्सवेलला १०.५ कोटी रुपयांत संघात दाखल केले होते.
हेही वाचा -बुमराहला पछाडत 'हा' गोलंदाज ठरला अव्वल
कोपऱ्याच्या दुखापतीमुळे मॅक्सवेलने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय व टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्याच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात डार्सी शॉर्टचा समावेश करण्यात आला आहे. या दुखापतीतून त्याला सावरण्यासाठी ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली.
पंजाबअगोदर, राजस्थान रॉयल्सलाही मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. जून मध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आर्चर पुन्हा मैदानावर परतणार आहे.