दुबई - आयपीएलमधील सलामीच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघात निवडीसाठी उपलब्ध होणार आहे. आयपीएल फ्रेंचायजी किंग्ज इलेव्हन पंजाबने शनिवारी ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर १७ सप्टेंबरला मॅक्सवेल यूएईला पोहोचला.
"आता मॅक्सवेलला नियमांनुसार, इंग्लंडच्या बायो बबलमध्ये वास्तव्य केल्यामुळे त्याला पाच दिवसांऐवजी तीन दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये राहावे लागले. त्याचा हा कालावधी आज पूर्ण होईल. यानंतर मॅक्सवेल २० सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पंजाबच्या पहिल्या सामन्यासाठी तो निवडीसाठी उपलब्ध होईल", असे पंजाबने म्हटले आहे.
मॅक्सवेलने यूएई गाठल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा २५-सदस्यीय संघ आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. या आठवड्यात मॅक्सवेल व्यतिरिक्त मुजीब उर रेहमान, निकोलस पूरन आणि शेल्डन कॉटरेल हे संघात सहभागी होतील.
आयपीएलचा १३वा हंगाम ५३ दिवसांचा आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. बीसीसीआयने साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.