नवी दिल्ली -मानसिक स्वास्थासाठी क्रिकेटमधून घेतलेला 'ब्रेक' उरकल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आगामी आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, आयपीएलच्या लिलालावामध्ये १० कोटींच्या घरात पोहोचलेला मॅक्सवेल आता एका व्हिडिओमुळे 'अग्निसुरक्षारक्षक' म्हणून व्हायरल होत आहे.
हेही वाचा -वानखेडेवर 'या' दिवशी रंगणार आयपीएल-२०२० चा पहिला सामना
एका व्हिडिओमुळे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी लाडका असलेला मॅक्सवेल आता मैदानाबाहेरही 'हिरो' ठरला आहे. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेदरम्यान मॅक्सवेलने कौतुकास्पद कृत्य केले. या स्पर्धेच्या १७ व्या सामन्यापूर्वी लॉन्सेस्टनमधील औरोरा स्टेडियमच्या बाहेर अचानक झुडुपांना आग लागली. स्टेडियमच्या आवाराबाहेरील कोरड्या गवतात ही आग लागली. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या मॅक्सवेलने कोणाच्याही मदतीची वाट न पाहता स्वत:च अग्निशमन यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही एकत्र होते.
या घटनेचा पूर्ण व्हिडिओ स्टेनने रेकॉर्ड केला आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियामधील जंगलांच्या आगीने अनेकांना त्रास झाला होता. कोट्यवधी जनावरेही मरण पावली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीबीएलमधील एक सामनाही रद्द करावा लागला होता. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने मॅक्सवेलला तब्बल १० कोटी ७५ लाखांना विकत घेतले आहे.