नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात धूमाकूळ घातला असून या व्हायरसने क्रीडाविश्वातही शिरकाव केला आहे. आज शनिवारी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने स्वत: ला कोरोनाची लागण झाल्याचे उघड केले. त्यानंतर जगभरातून त्याच्या चाहत्यांनी तो ठीक व्हावा, म्हणून प्रार्थना केली. आता आफ्रिदीचा मैदानावरील कट्टर विरोधक असलेल्या गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा खासदार असलेल्या गौतम गंभीरने आफ्रिदीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गंभीर एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ''या व्हायरसची लागण कोणालाही होऊ नये. आफ्रिदीशी माझे काही बाबतीत मतभेद आहेत, पण लवकरात लवकर तो बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो.''