नवी दिल्ली -दिल्लीत जेएनयूच्या (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर जेएनयूत रविवारी हल्ला झाला. या हल्ल्यात आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. अभाविप या उजव्या विद्यार्थी संघटनेच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक संघटना आणि संस्था एकत्र आल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यानेही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
हेही वाचा -इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आता 'या' विक्रमात अश्विनच्या पुढे
'विद्यापीठ परिसरात अशाप्रकारचा हिंसाचार हा या देशाच्या मूल्यांच्या विरोधात आहे. विचारसरणी कोणतीही असो किंवा आपला कल कोणाच्या बाजूने आहे याने फरक पडत नाही. या प्रकारचा हिंसाचार विद्यार्थ्यांविरूद्ध केला जाऊ नये. या गुंडांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, ज्यांनी विद्यापीठात प्रवेश करण्याचे धाडस केले आहे', असे गंभीरने ट्विटमध्ये म्हटले. जेएनयू हिंसाचाराचे तीव्र पडसाद देशभरातही उमटत आहेत. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतील अनेक महाविद्यालये आणि संस्था एकत्र आल्या आहेत.
संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजेदरम्यान काही गुंड विद्यापीठ परिसरात आले. त्यांनी विद्यापीठ वसतिगृहाच्या दिशेने दगडफेक करत तोडफोड केली, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 'तोंड झाकलेल्या गुंडांनी आपल्याला बेदम मारहाण केली. माझ्या शरीरातून रक्तस्त्राव होत आहे, असे आयशी घोष यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. मध्यरात्री १२ वाजेपासून या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. गुंडांवर कारवाई करण्याची मागणीही या संस्थांनी केली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे हे आंदोलन होत आहे. विद्यार्थ्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.