शारजाह -आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वरच्या फळीत फलंदाजी करायला हवी होती, असे मत भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा १६ धावांनी पराभव केला. या सामन्यात धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत सात गडी गमावून २१६ धावा केल्या. तर, प्रत्युत्तरात चेन्नई २० षटकांत २०० धावा करू शकला. गंभीर म्हणाला, "खरे सांगायचे झाल्यास मी आश्चर्यचकित झालो. धोनी सातव्या क्रमांकावर? ऋतुराज गायकवाड आणि सॅम करनला पुढे पाठवले गेले. मला हे समजले नाही. तुम्हाला पुढाकाराने संघाचे नेतृत्व केले पाहिजे. २१७ धावांचा पाठलाग करताना धोनी सातव्या क्रमांकावर? मला वाटते फक्त डु प्लेसिस एकटा ही लढाई लढत होता.''