मुंबई -अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणने काल शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्तीची घोषणा केली. युसुफच्या या निर्णयानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) माजी सहकारी गौतम गंभीरने त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. केकेआरच्या आयपीएल विजेतेपदात युसुफ आणि गंभीर संघात होते. आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये युसुफने गंभीरचे नाव लिहिले होते.
गौतम गंभीरनेही आपल्या ट्विटर हँडलवरून यूसुफ पठाणला एक चांगला माणूस आणि सामना जिंकवणारा म्हणून संबोधले आहे. ''भारत आणि केकेआरसाठी मी तुझ्याबरोबर खेळलो, हे माझे सौभाग्य होते. भरपूर प्रेम'', असे गंभीर म्हणाला.
हेही वाचा - सचिन रमेश तेंडुलकर पुन्हा कर्णधार!
निवृत्तीच्या पोस्टमध्ये युसुफने सर्वांचे आभार मानले. त्याने आपल्या भावाला म्हणजेच इरफान पठाणला पाठीचा कणा म्हणूनही वर्णन केले. युसुफ पठाण बर्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर होता आणि नंतर त्याला बडोदा संघातूनही वगळण्यात आले. आयपीएलमध्येही या वेळी कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही.
कारकीर्द -
भारतीय संघाकडून युसुफ पठाणने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केले. टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध मैदानात प्रवेश केला. युसुफ टीम इंडियाकडून दोन्ही फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळला. भारतीय संघासाठी अष्टपैलू युसुफ पठाणने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५७ सामने खेळताना ८१० धावा केल्या आहेत. या काळात त्याने गोलंदाजीतही ३३ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने २२ सामन्यात २३६ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात त्याच्या नावावर १३ बळींची नोंद आहे. त्याचवेळी आयपीएलमध्ये त्याने १७४ सामने खेळत ३२०४ धावा चोपल्या आहेत. तर, ४२ फलंदाजांना तंबुचा मार्ग दाखवला आहे.