नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव जगभरासह भारतातही वेगाने होत आहे. मागील दोन दिवसांमध्ये देशभरात १०० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशात क्रीडा तसेच विविध क्षेत्रातून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भाजपचा खासदार आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरही मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने या लढाईसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, याआधी भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानेही आपली ६ महिन्यांची पगार देण्याचे जाहीर केलं आहे.
गौतम गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत ट्विट केलं आहे. त्यात तो म्हणतो, 'शस्त्राशिवाय कोणतीही लढाई जिंकता येत नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत, उपचार आणि साधनात कोणतीही कमी येऊ नये, यासाठी मी आपल्या खासदार निधीतून ५० लाख रुपयांची मदत रुग्णालयांना घोषित करत आहे.'
तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग करताना लिहलं आहे की, 'घरात राहा, सावधान राहा आणि स्वच्छता राखा. याकामी सरकारला साथ द्या, असे आवाहन केले आहे.