नवी दिल्ली -'भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर लवकरच आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा सह-मालक होऊ शकेल', अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये ५० टक्के भागीदारी असणाऱ्या जीएमआर ग्रुपशी गंभीरने चर्चा केली आहे. उर्वरित ५० टक्के भागीदारी जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सची आहे. गंभीर दिल्ली कॅपिटल्सचा १० टक्के भागीदार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -दक्षिण आशियाई स्पर्धा : १२४ पदकांसह भारताने पटकावले अव्वल स्थान
या कराराची पुष्टी झाल्याची आणि बीसीसीआयच्या अधीन असलेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गंभीर दहा टक्के भागभांडवल खरेदी करण्यास तयार आहे, ज्याचे मूल्य जवळपास १०० कोटी रुपये आहे, असे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी जेएसडब्ल्यूने ५५० कोटी रुपयांत संघातील ५० टक्के हिस्सा विकत घेतला दिल्लीचे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स करण्यात आले. दिल्लीचा संघ गेल्या काही वर्षांपासून खराब कामगिरीसह झगडत होता परंतु शेवटच्या मोसमात तो तिसऱ्या स्थानावर राहिला होता.
आयपीएलमध्ये गंभीरने खेळाडू म्हणून डेअरडेव्हिल्सबरोबर प्रवास सुरू केला होता. आणि त्यानंतर तीन वर्षांनी तो कोलकाता नाइट रायडर्समध्ये गेला, तेथे त्याने आयपीएलची दोनही विजेतेपदे जिंकून दिली होती.