मुंबई- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीचा चौकार मारला आहे. त्याने वैद्यकीय क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ मास्क आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विमेंट दान दिले आहेत. गंभीरने यापूर्वी तीन वेळा मदत केली आहे. पण, एवढ्यावरच न थांबता त्याने पुन्हा मदत देत, एक नवा आदर्श घालून दिला आहे.
गौतम गंभीरने कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रथम ५० लाख, १ कोटी आणि नंतर खासदार म्हणून मिळत असलेला दोन वर्षाचा पगार देण्याचे जाहीर केले आहे. आता त्याने वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी थेट मदत दिली आहे.
कोरोना लढाईत, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांसाठी गंभीरने ५०० एन ९५ मास्क आणि १२५ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विमेंट दान केले आहेत. गंभीरने हे दान दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री रुग्णालयाला दिले आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली.