नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीर याने 'सिक्सर किंग' युवराज सिंहची जर्सी निवृत्त करावी, अशी मागणी केली आहे. युवराजने २००७ आणि २०११ च्या विश्वकरंडक विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे युवराजचा सन्मान झाला पहिजे, असे गंभीरचे म्हणणे आहे. दरम्यान, याआधी बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे.
गंभीरने सांगितले की, 'सप्टेंबर महिना माझ्यासाठी खास असून याच महिन्यात २००७ साली भारताने टी-२० विश्वकरंडक जिंकला होता. या विश्वकरंडकात युवराजने दणकेबाज कामगिरी केली होती. यानंतर २०११ साली भारताने जिंकलेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये युवराजचा मोलाचा वाटा होता. यामुळे युवराजचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी मी बीसीसीआयकडे मागणी करेन की त्याची 12 क्रमांकाची जर्सी रिटायर करण्यात यावी.'
दरम्यान, खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट बोर्ड त्या खेळाडूची जर्सी निवृत्त करते. म्हणजे, याचा अर्थ कोणताही खेळाडू या क्रमांकाची जर्सी वापरू शकत नाही. हा एकप्रकारे त्या खेळाडूचा सन्मान मानला जातो.