नवी दिल्ली - 2007मध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी केला. कर्स्टन यांनी पुन्हा एकदा भारतासोबतच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यांनी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरशी असलेल्या खास संबंधाविषयी सांगितले.
कर्स्टन यांनी असे असेही उघड केले, की सचिन त्याच्या फलंदाजीच्या क्रमाविषयी खूष नव्हता आणि 2007 मध्ये त्याने आपली कारकीर्द संपवण्याचा विचार केला होता. 2007 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला गट साखळीतूच बाहेर पडावे लागले होते.
कर्स्टन म्हणाले, "सचिनसोबतचा माझा कोचिंगचा प्रवास खूपच रम्य होता. मी जेव्हा भारतात आलो तेव्हा त्याने निवृत्ती घेण्याचा विचार केला. त्याच्या म्हणण्यानुसार, तो फलंदाजीच्या क्रमाविषयी खूष नव्हता, तो त्याच्या क्रिकेटचा अजिबात आनंद घेत नव्हता."